‘सिलसिला’ चित्रपटापासून शिव-हरी यांचा संगीतकार म्हणून सुरू झालेला प्रवास केवळ बारा वर्षांतच खंडित झाला. मात्र, अजूनही शिव-हरि म्हणून संगीतप्रधान चित्रपटासाठी गीते स्वरबद्ध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो तर मला आनंदच होईल, अशी भावना ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी व्यक्त केली. मात्र, सध्याच्या चित्रपट संगीतामध्ये आम्ही काही करावे, अशी शक्यता आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शास्त्रीय संगीतामध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी ‘शिव-हरी’ या नावाने चित्रपट संगीत दिले आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला’ चित्रपटाच्यानिमित्ताने १९८१ मध्ये एकत्र आलेल्या शिव-हरी यांनी केवळ आठ चित्रपटांना संगीत दिले आहे. ‘फासले’, ‘विजय’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘परंपरा’, ‘साहिबाँ’ यासह १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘डर’ हा या जोडगोळीचा अखेरचा चित्रपट ठरला. योगायोगाने हे सर्व चित्रपट यश चोप्रा यांचेच होते. यापैकी काही चित्रपट तिकिट खिडकीवर अयशस्वी ठरले असले तरी शिव-हरी यांचे संगीत गाजले. पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरासिया हे अभिजात संगीतामध्ये काम करण्यासाठी चित्रपटांपासून दूर झाले, त्यालाही आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. गानसरस्वती महोत्सवासाठी पुण्यात आलेल्या पं. हरिप्रसाद चौरासिया यांना शिव-हरी पुन्हा कधी एकत्र येणार असे विचारले असता, आम्ही एकत्र आलो तर मला आनंदच होईल, असे सांगितले.
पं. हरिप्रसाद चौरासिया म्हणाले,‘‘चित्रपट संगीतामध्ये आम्ही आपल्या सुरांचे रंग भरले आहेत. पण, संगीतकार म्हणून स्वतंत्ररीत्या चित्रपटाला संगीत देणे हेदेखील एक प्रकारचे आव्हानात्मक काम आहे. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा जास्तीत जास्त दहा हजार लोक आनंद घेतात. पण, चित्रपट संगीत हे एकाच वेळी कोटय़वधी लोक ऐकत असतात. त्यामुळे चित्रपटासाठी संगीतकार म्हणून काम करणे कधी गौण मानले नाही. आम्ही काम केले तेव्हा काव्याचे शब्द उत्तम होते. आता तशी परिस्थिती उरलेली नाही. त्यातूनही एखादा संगीतप्रधान चित्रपट मिळाला आणि शिव-हरी एकत्र यावेत ही नियतीची इच्छा असेल तर, ही घटना माझ्यासाठी आनंददायी असेल.’’

Story img Loader