पुणे : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे चार महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले होते. उद्घाटनानंतर आता अखेरीस त्यावरून प्रत्यक्ष सेवा सुरू झाली आहे. या टर्मिनलवरून पहिल्या विमानाचे उड्डाण रविवारी झाले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते टर्मिनलवरील पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास देऊन या टर्मिनलची सेवा सुरू करण्यात आली.
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांची सेवा नवीन टर्मिनलवरून पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. एअर इंडियाचे पुणे ते दिल्ली आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे पुणे ते भुवनेश्वर या विमानांचे उड्डाण सर्वप्रथम नवीन टर्मिनलवरून झाले. नवीन टर्मिनलवर रविवारी ९ विमानांचे उड्डाण होणार असून, ९ विमाने उतरणार आहेत. या टर्मिनलवर सोमवारपासून १६ विमानांचे उड्डाण होणार असून, १६ विमाने उतरणार आहेत. नवीन टर्मिनलवरून टप्प्याटप्प्याने विमानांची संख्या वाढविली जाणार आहे.
हेही वाचा – पुणे : पद्मावतीत अचानक मोटारीला आग; कारण काय?
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, नवीन टर्मिनलचे उद्घाटन मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. टर्मिनलची काही कामे राहिलेली असल्याने ते सेवेसाठी खुले करण्यात आले नव्हते. आता सगळी कामे पूर्ण झाल्यानंतर टर्मिनल प्रवाशांसाठी खुले झाले आहे. नवीन टर्मिनल हे अतिशय सुंदर असून, त्यातून महाराष्ट्राची संस्कृती दर्शविण्यात आली आहे. याचबरोबर त्याला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या १० वर्षांत ७५ नवीन विमानतळे आणि ४६९ हवाई मार्ग सुरू झाले आहेत. देशातील नागरी हवाई क्षेत्र हे जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. आगामी काळात २० ते २५ नवीन विमानतळे कार्यान्वित होणार आहेत.
पुणेकर प्रवाशांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. नवीन टर्मिनलवरील पहिली प्रवासी ठरणे हे माझ्यासाठी अतिशय गौरस्वापद आहे. हवाई प्रवाशांसाठी उभारलेल्या टर्मिनलमुळे हवाई प्रवास आणखी सुकर होण्यास मदत होईल. पुणे विमानतळाची प्रवासी क्षमताही यामुळे वाढणार आहे, असे नवीन टर्मिनलवरील पहिल्या प्रवासी लेफ्टनन्ट कर्नल मनिषा यांनी सांगितले.
पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठीही प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारकडूनही यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच धावपट्टी विस्ताराचा प्रश्न मार्गी लागेल. यामुळे पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
असे आहे नवीन टर्मिनल…
एकूण क्षेत्रफळ : ५२ हजार चौरस मीटर
तासाला प्रवासी क्षमता : ३ हजार
वार्षिक प्रवासी क्षमता : ९० लाख
प्रवासी लिफ्ट : १५
सरकते जिने : ८
चेक-इन काऊंटर : ३४
एकूण खर्च : ४७५ कोटी रुपये
© The Indian Express (P) Ltd