िपपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील १२ वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या युवतींना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, प्राप्त अर्जामधील पात्र उमेदवारांना साडेसात हजार रूपये देण्यात येणार असून त्यासाठी होणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या वतीने महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध योजना राबवण्यात येतात. हद्दीतील युवतींना १२ वीनंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक तसेच पदवी परीक्षांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या युवतींना या योजनेअंतर्गत प्रत्येकी ७५०० रूपये इतके अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. महापालिकेने यासंदर्भात जाहीर प्रकटन करून अर्ज मागवले होते. ४ जुलै ते ३१ ऑगस्ट २०१२ दरम्यानच्या मुदतीत १४५ अर्ज प्राप्त झाले होते. तथापि, छाननीत १२९ अर्ज अपात्र ठरवण्यात आले. पात्र ठरलेल्या १६ अर्जदारांना प्रत्येकी साडेसात हजार रूपये याप्रमाणे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या सव्वा लाख रूपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधी संबंधितांना दिली जाणार आहे. त्याची पूर्तता झाल्यानंतर त्यांनाही अर्थसाहाय्य करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.