महापालिकेचा निर्णय; ९० कुटुंबांना प्रत्येकी ११ हजार रुपये

मुठा उजवा कालवा फुटीमुळे बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार पूर्णत: बाधित ९० कुटुंबांना प्रत्येकी ११ हजार रुपये आणि अंशत: बाधित ६६९ कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये अर्थ साहाय्य करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

खडकवासला धरणाच्या मुठा उजवा कालव्याची भिंत खचून कालवा फुटल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून पंचनामे करून बाधित कुटुंबांची संख्या निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर या बाधितांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे होता. त्याला मंगळवारी मान्यता देण्यात आली. बाधित कुटुंबांना नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार आहे.  कालवाफुटीमधील ९० कुटुंबे पूर्णपणे बाधित झाली आहेत. त्यांना प्रत्येकी ११ हजार रुपये याप्रमाणे नऊ लाख ९० हजार रुपये आणि अंशत: बाधित ६६९ कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे ३३ लाख ४५ हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. एकूण ७५९ कुटुंबांना ४३ लाख ३५ हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकातील झोपडपट्टी धारकांना आपत्कालीन साहाय्य या अंतर्गत १६ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. या शिल्लक तरतुदीतून आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील ४१ लाख ४० हजार रुपयांच्या तरतुदीतून ही मदत करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा २७ सप्टेंबर रोजी फुटला होता. त्यामुळे दांडेकर पूल, जनता वसाहत, दत्तवाडी भागाला त्याचा मोठा फटका बसला होता. दांडेकर पूल आणि जनता वसाहतीमधील अनेक कुटुंबे त्यामुळे बाधित झाली होती. यापूर्वी बाधितांना मदतीसाठी तीन कोटी रुपयांचा विशेष निधी राज्य शासनाने मंजूर केला होता. तसेच एका महिन्याचे धान्य आणि गॅस सिलिंडर गहाळ झालेल्यांना जुन्या नोंदी पाहून सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.