पुणे : येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातील अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करुन मनी ऑर्डर पुस्तिकेत फेरफार करुन २६ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सचिन रघुनाथ फुलसुंदर असे गुन्हा दाखल केलेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत कारागृह अधिकारी बाबूराव मोटे (वय ३८) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन फुलसुंदरविरुद्ध बलात्कार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २००६ मघ्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात फुलसुंदरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. फेब्रुवारी २०१२ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान त्याने कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कारखाना विभागात तयार होणाऱ्या वस्तू बाहेर विक्रीस पाठविण्याचा बहाणा केला. कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याने विश्वासात घेतले.
हेही वाचा – पुणे : फिनिक्स माॅलच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या बंडावेळी आमदारांना ५० कोटींचं प्रलोभन – अंबादास दानवे
येरवडा कारागृहात कारखाना विभागात काम करणाऱ्या कैद्यांना दररोज वेतन दिले जाते. वेतनातून मिळणारी रक्कम काही कैदी टपाल खात्याच्या मनी ऑर्डर सुविधेद्वारे कुटुंबीयांना पाठवितात. मनी ऑर्डरच्या नोंदणी पुस्तिकेत त्याने कारागृह अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी, बनावट हिशेब, तसेच अन्य कैद्यांची नावे टाकून २६ लाख ६९ हजार ९११ रुपयांचा अपहार केला. कारागृहातील अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.