राज्य मंडळाकडून घेतली जाणारी दहावी आणि बारावीची परीक्षा फॉर्म नंबर १७ भरून खासगीरित्या देणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी संपर्क केंद्रांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी केली जात असल्याचा आरोप बालहक्क कृती समितीकडून करण्यात आला.

हेही वाचा >>> पुणे : महावितरणच्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ; ग्रामीण भागात रोहित्र चोरीचे १२ गुन्हे उघड

सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक समस्यांमुळे शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी फॉर्म नंबर १७ भरून खासगीरित्या परीक्षा देण्याची सुविधा राज्य मंडळाने दिली आहे. मात्र परीक्षेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचा असल्याने विद्यार्थ्यांच्या अर्धशिक्षित किंवा अशिक्षित पालकांची गैरसोय होते. परीक्षा अर्ज भरण्यास सायबर कॅफेत गेल्यास सायबर कॅफेचालक जास्तीचे शुल्क घेतात. तसेच अर्ज भरून संपर्क केंद्राकडे गेल्यावर आमच्या पूर्वपरवानगीशिवाय केंद्राची निवड का केली अशी विचारणा करून संबंधितांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी केली जाते. संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज विभागीय मंडळात जमा करून घेण्यास मंडळाचे अधिकारी नकार देतात, अशी माहिती समितीचे मंदार शिंदे यांनी दिली. या बाबत राज्य मंडळाकडे तक्रार दाखल केल्यावर मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी पुणे विभागीय मंडळाच्या सचिवांना सूचना दिल्या.
मंडळाने फॉर्न नंबर १७ द्वारे अर्ज मागवताना संपर्क केंद्रांची माहिती जाहीर करावी. संपर्क केंद्रांमध्ये विनामूल्य सहाय्य कक्ष सुरू करावा. केंद्रांना अर्ज जमा करून घेण्याची, अतिरिक्त शुल्क न मागण्याच्या लेखी सूचना द्याव्यात. राज्य मंडळाने शिक्षण विभागाशी समन्वय साधून अतिरिक्त शुल्काची मागणी करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी. अडवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विभागीय मंडळांच्या कार्यालयात स्वीकारण्याची सोय करावी, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील वाहतूक रात्री अडीच तास बंद

खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संपर्क केंद्रामार्फतच ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. संपर्क केंद्रांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्यास त्याची चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.- शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ

Story img Loader