सातारा रस्ता वाहतुकीसाठी कमी पडत असल्यामुळे जलद गती बससेवेअंतर्गत (बस रॅपिड ट्रान्झिट- बीआरटी) सेवा रस्ते, पदपथ हटवून या रस्त्याची पुनर्रचना करण्यासाठी तब्बल ७५ कोटींचा खर्च केला असताना आता पदपथांचे विकसन आणि सायकल मार्ग उभारण्यासाठी पुन्हा २३ कोटी रुपयांचा घाट महापालिका प्रशासनाकडून घालण्यात आला आहे. सातारा रस्त्यावरील एकूण ५.४ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी हा खर्च करण्यात येणार असून पदपथ आणि सायकल मार्गाच्या विकसनामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अरूंद होण्याची भीती असून बीआरटी मार्गावरील ही उधळपट्टी वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

पुणे-सातारा रस्त्यावर सन २००६-०७ मध्ये बीआरटी रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मार्गावर बीआरटी प्रकल्प आणल्यानंतर अपघातांचे वाढलेले प्रमाण आणि सातत्याने होत असलेली वाहतुकीच्या कोंडीमुळे बीआरटी मार्गावर सातत्याने विविध प्रयोग सुरू झाले. प्रशासनावर टीका होत असल्यामुळे बीआरटी मार्गाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीआरटी मार्गाच्या उभारणीसाठी १०० कोटी  खर्च केल्यानंतर पुनर्रचनेसाठी ७५ कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली होती. त्याअंतर्गत सेवा रस्ते, रस्त्याच्या एका बाजूचे पदपथ आणि सायकल मार्ग हटवून रस्ता रूंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीआरटी धोरणाअंतर्गत सेवा रस्ता आणि पदपथ, सायकल मार्ग हटविण्यात आल्यामुळे धोरणालाच हरताळ फासला गेला होता. त्यामुळे पुनर्रचनेची कामे सुरू असतानाच सायकल मार्ग आणि पदपथ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी २३ कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने शुक्रवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे सातारा रस्ता बीआरटीसाठी आणखी उधळपट्टी होणार असल्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

‘बीआरटीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने पदपथ आणि सायकल मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीला देण्यात आला. निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीला २२ कोटी ७७ लाख ८८ हजार रुपयांचे हे काम देण्यात आले. सध्या अस्तित्वातील काँक्रिट रस्ता तसाच ठेवून त्या लगतच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आहे. त्यानुसार अस्तित्वातील सायकल मार्ग, पदपथ आणि सेवा रस्ते काही ठिकाणी हटविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकी तीन मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. या मार्गिकांलगत सायकल मार्ग आणि पदपथांचे विकसन करण्यात येईल,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सांगितले.

स्वारगेट येथील जेधे चौक ते लक्ष्मीनारायण हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) असल्यामुळे तो वगळून ५.४ किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गात या सुधारणा होणार आहेत. नगर रस्ता, आळंदी रस्ता बीआरटी मार्गाप्रमाणे बीआरटी बसथांबे हे सध्याच्या पुनर्रचनेत रस्त्याच्या मध्यभागी घेण्यात आले आहेत.

अतिक्रमणांचा विळखा

सातारा रस्त्यावरील पदपथ आणि सेवा रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्याचे प्रकार सर्रास वाढत आहेत. त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बीआरटी पुनर्रचनेची कामेही अधर्वट असल्यामुळे बीआरटी मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला असून वाहतुकीबाबत गोंधळाची परिस्थिती आहे. त्यात आता पदपथ आणि सायकल मार्गाची कामे होणार असल्यामुळे या प्रस्तावित पदपथांनाही अतिक्रमणांचा विळखा पडण्याची शक्यता आहे.

रस्ते अरुंदीकरणाचे धोरण

वाहनाची वाढती संख्या आणि वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता रस्ते वाहतुकीसाठी अधिकाधिक प्रशस्त असणे अपेक्षित आहे. एका बाजूला शहरातील रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र अर्बन स्ट्रीट डिझाईन आणि स्ट्रीट प्रोगॅम अंतर्गत मॉडेल रोड या संकल्पनेुसार शहरातील रस्ते अरूंद करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. शंभर किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची याअंतर्गत पुनर्रचना करण्यात येणार आहे. पदपथ प्रशस्त होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Story img Loader