एमआयडीसीचा पिंपरीतील १०० गुंठय़ांचा भूखंड पोलीस बंदोबस्तात तातडीने खाली करून देण्याची तत्परता सर्व लाभार्थीनी संगनमताने केली असून त्यामागे सत्ताधारी पक्षाचे नेते व शासकीय अधिकाऱ्यांचे अर्थकारण असल्याची माहिती पुढे आली आहे.
पिंपरीत संततुकारामनगरच्या शेजारी महात्मा फुलेनगर येथे एमआयडीसीचा अडीच एकरचा भूखंड आहे, त्यावर जवळपास ३०० झोपडय़ा आहेत. अलीकडेच हा भाग चांगल्या प्रकारे विकसित होत असून मोठ-मोठे गृहप्रकल्प उभे राहत असल्याने जागांचे भाव वधारले आहेत. मुख्य रस्त्यालगतच एमआयडीसीचा भूखंड असल्याने यास मोठा भाव असून बाजारभावानुसार पाच कोटीपर्यंत किंमत असल्याचे सांगण्यात येते. या भूखंडावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खूप आधीपासून डोळा आहे. मात्र, त्यावर असलेल्या झोपडय़ा अडचणीच्या होत्या. त्या काढण्यासाठी योग्य संधीच्या शोधात ‘लाभार्थी’ मंडळी होती, त्यांना एक निमित्त मिळाले.
चिंचवडच्या एम्पायर इस्टेटपासून ते अॅटो क्लस्टपर्यंत बीआरटी रस्ता प्रस्तावित आहे. त्यात एका बडय़ा असामीचा औद्योगिक भूखंड बाधित होतो. सदर जागेच्या बदल्यात दुसरा भूखंड मिळावा, यादृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होते. अशा कामगिरीसाठी माहिर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याने व त्याच्या शागिर्दाने चिंचवडच्या त्या जागेऐवजी महात्मा फुलेनगरचा भूखंड मिळवून देण्याची ग्वाही दिली. शासनाकडून पालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या एका अधिकाऱ्याने काही संबंध नसताना बराच उत्साह दाखवत दलालीचे काम केल्याचे समजते. महापालिका व एमआयडीसी यांच्यातील समन्वय बैठकीत हा विषय निघाला. तेव्हा शागिर्दाने झोपडय़ांचा त्रास असल्याचे सांगून त्या काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. अतिक्रमण काढणे सोपे जावे म्हणून या जागेवर खेळाचे मैदान विकसित करण्याचा ठराव मंजूर झाला. पुढे, एका अन्य बैठकीत पोलिसांच्या मदतीने या जागेवरील झोपडय़ा काढण्याचे ठरले. पोलीस, पालिका व सत्ताधारी लोकप्रतिनिधी सगळे जुळून आल्याने कारवाईला ‘मुहूर्त’ मिळाला. मात्र, गुप्तपणे होणाऱ्या कारवाईचे िबग फुटले आणि मोर्चे, आंदोलनामुळे सगळेच ‘अर्थकारण’ बिघडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा