डांबरी रस्ते खराब होतात या नावाखाली सरसकट शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचा आग्रह धरला जात असला, तरी तो अत्यंत चुकीचा आहे. शहरातील साठ टक्के रस्त्यांना पावसाळी गटारे नसल्यामुळे खड्डे पडत आहेत. तसेच खड्डे पडायला इतरही अनेक कारणे आहेत, हे वास्तव लक्षात घ्यावे, असे पत्र भारतीय जनता पक्षाने महापालिका आयुक्तांना दिले आहे.
भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी खड्डय़ांच्या समस्येबाबतचे हे पत्र सोमवारी आयुक्तांना दिले. डांबरी रस्त्यांना खड्डे पडत असल्यामुळे त्यांची वारंवार दुरुस्ती करावी लागते. त्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही, अशी चर्चा सध्या केली जात असली, तरी शहरातील काही डांबरी रस्ते आजही चांगल्या अवस्थेत आहेत. मुळातच, खड्डे पडण्यामागची कारणे शोधून त्यावर उपाय होणे आवश्यक आहे, असे शिरोळे यांनी या पत्रात म्हटले आहे. शहरातील साठ टक्के रस्त्यांना पावसाळी गटारे नाहीत आणि हे खड्डे पडण्याचे महत्त्वाचे कारण आहे. खड्डय़ांची कारणे शोधून त्यावर उपाय केल्यास डांबरी रस्तेही सक्षम बनवता येतील. त्यासाठी सरसकट काँक्रिटीकरणाची गरज नाही, असेही शिरोळे यांचे म्हणणे आहे.
सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करायचे झाल्यास त्याला जो फार मोठा खर्च येतो तो निधी कोठून आणणार याचाही विचार करावा लागेल. सध्या महापालिकेकडे निधी नसल्यामुळे काँक्रीटचे रस्ते टप्प्याटप्प्याने पैसे देण्याच्या तत्त्वावर करून घेतले जात आहेत. त्यामुळे काँक्रिटीकरणासाठी लागणारी मोठी रक्कम महापालिका कशी उभी करणार याचाही विचार करावा, असे भाजपचे म्हणणे आहे.
मेट्रोचा जादा खर्च नक्की किती?
पुण्यात भुयारी मेट्रो केली, तर जादा खर्च येईल आणि तिकीट दर खूप ठेवावा लागेल. तो पुणेकरांना परवडणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. भुयारी मेट्रोला नक्की किती जादा खर्च येणार आहे ते पुणेकरांना समजले पाहिजे. त्यानुसार समस्येचे स्वरूप स्पष्ट होईल. तसेच अशा प्रकल्पांना सरकार अनुदान देते, त्यासाठीही पाठपुरावा करता येईल, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली असून खर्चाबाबत माहिती मागवणारे पत्रही पक्षातर्फे आयुक्तांना देण्यात आले आहे.

Story img Loader