लोकसत्ता वार्ताहर
शिरुर : चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय येथे ‘सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळाच्या’ वतीने आयोजित ‘सामाजिक शास्त्रातील आव्हाने आणि संधी’ या विषयावर शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांच्या व्याख्यानाचे महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के . सी. मोहिते, उपप्राचार्य. प्रा. एच. एस. जाधव , सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. पवार यांनी सामाजिक शास्त्राचे महत्व प्रतिपादन करताना सामाजिक शास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थ्यांनी विषयाच्या पारंपारिक चौकटीत राहिल्यास ते विषय नष्ट होऊ शकतील त्याऐवजी त्यांनी निरीक्षण, संवाद, चर्चा या माध्यमातून जीवन अनुभव घेतल्यास सामाजिक शास्त्रातील विषयांना व या ज्ञानशाखेला नवसंजीवन प्राप्त होऊ शकेल. यासाठी ज्ञानाचे बहुपैलूत्व लक्षात घेणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता माणसास सहाय्य करू शकते,मदत करू शकते पण तो संपूर्ण मनुष्यास पर्याय ठरू शकत नाही. माणसासारखा हुबेहूब माणूस तयार करता येत नाही. ज्ञानाच्या निर्मितीचा मूळ स्रोत माणसाचं त्याच्या
अवतीभोवतीचे जग, शेजारचा माणूस हा ज्ञानाचा पहिला स्रोत आहे. ज्ञान अवतीभोवती आहे फक्त तुमची निरीक्षण क्षमता हवी.तसेच सामाजिक शास्त्रातील असणाऱ्या संधी, सामाजिक शास्त्रातील नवे प्रवाह, कृत्रिम बुद्धिमत्तेचा रोजगारावर होणारा परिणाम, भाषा, भारतीय संविधानाचे महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.के.सी. मोहिते यांनी व्यक्त केले . प्रास्ताविक सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळाचे समन्वयक डॉ. निलेश पाडळकर यांनी केले . व्याख्यात्यांचा परिचय डॉ. पद्माकर प्रभुणे , सूत्रसंचालन डॉ. क्रांती पैठणकर व कार्यक्रमाचे आभार प्रा. केशव गाडेकर यांनी मानले.