लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्राच्या माध्यमातून १७०० वाहनचालकांचा दंड कमी करण्यात आला. वाहतूक पोलिसांचे मदत केंद्र (हेल्प डेस्क) ८ सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित राहणार आहे.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ९ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीत तडजोडीने प्रलंबित खटले तडजोडीने मार्गी लावण्यात येतात. वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून वाहनचालकांसाठी मदत केंद्र सुरू (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहे. वाहनचालकांसाठी मदत केंद्र ८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
आणखी वाचा-पिंपरीत ठाकरेंच्या मशालीने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळून केला निषेध; मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद
सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत मदत केंद्राचे कामकाज सुरू राहणार आहे. प्रलंबित खटला, थकीत दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. वाहनचालकांना दंडाच्या रकमेतून सूट देण्यात येणार आहे. मदत केंद्रात न्यायालयातील पॅनल असणार आहे. मदत केंद्रात थकीत दंड कमी करुन घेण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांनी आधारकार्डची झेरॉक्स प्रत आणावी, असे आवाहन वाहतूक पोलीस आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.