पुणे : महापालिकेने रस्ते खोदाई करण्यास मज्जाव केला असतानाही मलवाहिनीची लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदणाऱ्या ठेकेदाराला तीनपट दंड महापालिकेच्या पथ विभागाने केला आहे. बेकायदा रस्ता खोदल्याप्रकरणी महापालिकेने २ लाख १९ हजार ४५६ रुपयांचा दंड पालिकेने केला असून, हा दंड भरल्यानंतरच संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पाला बांधकाम परवानगी द्यावी, असे बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे.

महापालिकेच्या पथ विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील रस्ते सुस्थितीत आणले. या रस्त्यांवर कोणतीही खोदाई केली जाणार नाही, असे महापालिकेच्या पथ विभागाने सांगितले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून शहरातील काही रस्ते खोदले जात असल्याचे प्रकार समोर आले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. बेकायदा रस्ते खोदले गेल्यास रस्ते खोदणाऱ्या संबंधित ठेकेदार, बिल्डर आणि हे काम करायला लावणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पथ विभागाने सांगितले होते. त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने रस्ता खोदणाऱ्याला तीन पट दंड केला आहे.

धायरी गावातून डीएसके विश्वकडे जाणारा रस्ता चार दिवसांपूर्वी तयार करून तेथे महापालिकेने डांबरीकरण केले होते. मात्र, सोमवारी हा रस्ता जेसीबीने खोदण्यास सुरुवात करण्यात आली होती. हा रस्ता खोदण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे पथ विभागाने स्पष्ट केले होते. रस्ता खोदल्याची तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी बेकायदा रस्ता खोदल्याने ठेकेदाराला २ लाख १९ हजार ४५६ हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले