सोमवारची सकाळ पुण्याच्या आकाशवाणी केंद्रासाठी विशेष होती. बातमी विभागात आलेल्या बातम्या वाचनासाठी लिहिल्या जात असताना एक खास वृत्तनिवेदक काही बातम्या चक्क ‘ब्रेल’ लिपीत लिहीत होते. सकाळच्या प्रादेशिक बातमीपत्राचे थेट प्रसारण सुरू झाले, बातम्यांच्या मध्यंतराचा ‘तो’ क्षण आला, पुढचे बातमीपत्र त्या खास वृत्तनिवेदकाने आपल्या बोटांच्या डोळ्यांनी वाचले आणि ती सकाळ आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठीही खास झाली!
‘त्या’ वृत्तनिवेदकाचे नाव आहे धनराज पाटील. पाटील हे दृष्टिहीन असून ते ‘पुणे ब्लाइंड मेन असोसिएशन’चे सदस्य आहेत. दृष्टिहीनांचा श्वास बनलेल्या ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीचे निमित्त साधून पुणे आकाशवाणी केंद्राने सोमवारी पाटील यांना प्रादेशिक बातम्यांचा उत्तरार्धातील भाग वाचण्याची संधी दिली. नभोवाणीवर दृष्टिहीन व्यक्तीने मराठीतून बातम्या वाचण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग ठरला.
‘दृष्टिहीनांसाठी आवाज हेच महत्त्वाचे माध्यम असून त्यामुळे त्यांचे आकाशवाणीशी जवळचे नाते आहे. त्यांना आकाशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये कसे सामावून घेता येईल याचा विचार सुरू होता. पुणे ब्लाइंड मेन असोसिएशनने दृष्टिहीन व्यक्तीस बातमीपत्र वाचण्याची परवानगी मिळण्याबाबत एक प्रस्ताव पाठवला व त्यानुसार आवश्यक त्या परवानग्या घेतल्या गेल्या आणि धनराज पाटील यांच्या आवाजाचे परीक्षणही करण्यात आले,’ असे पुणे केंद्राच्या वृत्त विभागाचे प्रमुख नितीन केळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘प्रमुख प्रश्न होता बातम्यांच्या ब्रेल लिपीतील टायपिंगचा. परंतु पाटील यांचा ब्रेलमध्ये लिहिण्याचा वेग उत्तम असून ते दहा मिनिटांचे बातमीपत्र तासाभरात ब्रेलमध्ये लिहू शकत होते. त्यामुळे या उपक्रमाबद्दलचा आमचा विश्वास वाढला. बातम्यांच्या वाचनाची आकाशवाणीची शैली, वाचताना कुठे शब्दांवर जोर द्यावा, कुठे थांबावे, याचा सराव पाटील यांनी चार दिवस केला.’
आकाशवाणीच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सोमवार सकाळच्या बातम्यांची तयारी रविवारी रात्री करून ठेवली जाते. त्यानुसार पाटील यांनी काही बातम्या रविवारीच ब्रेलमध्ये तयार केल्या व त्या घरी नेऊन वाचून पाहिल्या. सोमवारी सकाळी त्यांनी उर्वरित बातम्या ब्रेलमध्ये लिहिल्या. आकाशवाणीचे नियमित वृत्तनिवेदक मनोज क्षीरसागर यांनी बातमीपत्रास सुरुवात केली व उत्तरार्धात पाटील यांनी बातमीवाचन केले.

‘थेट प्रक्षेपणात बातमीपत्र वाचणे हे माझ्यासाठी आव्हान होते, परंतु मी त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. दृष्टिहीनांनी ब्रेलकडे दुर्लक्ष करू नये. ही लिपी दृष्टिहीनांना स्वावलंबी करते.’
– धनराज पाटील 

Story img Loader