नोलेक्स उद्योगसमूहाचे संस्थापक-अध्यक्ष प्रल्हाद पी. छाब्रिया (वय ८६) यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पुत्र प्रकाश छाब्रिया आणि कन्या अरुणा कटारा असा परिवार आहे. प्रल्हाद छाब्रिया यांच्या पार्थिवावर कैलास स्मशानभूमी येथे रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रल्हाद छाब्रिया यांचा जन्म १९३० मध्ये कराची येथे झाले. वयाच्या १२ व्या वर्षी कराचीतील एका लहान दुकानात त्यांनी कामास सुरुवात केली. फाळणीच्या कालखंडात स्थलांतरित होऊन ते भारतामध्ये आले होते. काही वर्षांनी प्रल्हाद छाब्रिया आणि त्यांचा धाकटा भाऊ अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुण्यामध्ये आले. काही काळ त्यांनी इलेक्ट्रीकल सप्लायर म्हणूनही काम केले. हे काम सुरू असतानाच हळूहळू त्यांनी इलेक्ट्रीकल रोप्समध्ये पाय रोवले आणि या उद्योगातूनच फिनोलेक्स नावाच्या वटवृक्षाचे बीजारोपण झाले. सध्या किमान १० हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक उलाढाल असलेल्या फिनोलेक्स केबल्स लि. कंपनीची मुहूर्तमेढ १९५४ मध्ये त्यांनी अत्यल्प भांडवलावर रोवली. उद्योगाचा विस्तार झाला आणि १९८१ मध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. असे त्याचे नामकरण झाले. छाब्रिया यांनी भारतात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबल्स आणि ठिबक सिंचनासाठीच्या केबल्स ही नावीन्यपूर्ण उत्पादने आणली. भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून फिनोलेक्स प्लॅसन लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली. इस्रायलबरोबर उद्योगाची भागीदारी करणारी फिनोलेक्स ही देशातील पहिली कंपनी ठरली. मुकुल माधव फाउंडेशन, होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थांच्या माध्यमातून छाब्रिया यांनी गरजूंना वैद्यकीय, शैक्षणिक आणि समाजकल्याणासाठी अर्थसाह्य़ केले.