पुणे : मकार संक्रातीत पतंगबाजीसाठी छुप्या पद्धतीने नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. सहकारनगर, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, वारजे, मार्केट यार्ड भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३६ हजार ८२० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.
हेही वाचा >>> ‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर केल्याने नागरिकांना गंभीर स्वरुपाच्या दुखापत होण्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना दुखापती होतात. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने नायलॉन मांजाचा वापर करण्यास बंदी घातली आहे. काही जण पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी गुन्हे शाखेने पथके तयार केली आहेत.
हेही वाचा >>> Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
सहकारनगर, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, वारजे माळवाडी, मार्केट यार्ड भागात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायदा, तसेच न्यायालायाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आाली. नायलॉन मांजाची विक्री केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी दिला आहे.