पुण्यातील पिंपरी येथे सासरे आणि दिराने विधवा महिलेवर अश्लील भाषेत शेरेबाजी करणे आणि नजरकैदेत ठेवण्यासाठी हॉलमध्ये सीसीटीव्ही लावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ९२ वर्षीय सासरा आणि ५८ वर्षीय दिराविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे दिराने विधवा महिलेच्या २९ वर्षीय मुलीला तुझी सेटिंग लावून देतो असं म्हणत अश्लील भाष्य केल्याचाही आरोप आहे. २००६ मध्ये पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर सासरे आणि दिराने ‘इथून निघून जा’ असा तगादा लावला. तसेच हॉलमध्ये सीसीटीव्ही लावला. पीडितेने सीसीटीव्ही काढण्यास सांगूनही तो काढण्यात आला नाही, असं तक्रारीत म्हटलंय.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे २००६ मध्ये निधन झाले. त्यानंतर पीडितेने दोन मुलींचा विवाह करून दिला. सध्या पीडिता तिच्या २९ वर्षीय मुलीसह सासरच्या व्यक्तींकडे राहते. मात्र, सासरे आणि दिराने पीडितेवर नजर ठेवण्यासाठी घराच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये सीसीटीव्ही लावला. पीडित सुनेच्या हालचालीवर सासरा आणि दिर नजर ठेवत होते. पीडित महिलेचा जावई घरी यायचा त्यावरून सासरे आणि दिर पीडितेला अश्लील बोलायचे. त्याचमुळे सासरा सुनेला नेहमी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजरकैदेत ठेवत असे.
दरम्यान, पीडित महिलेच्या ४ वर्षीय नातवाला त्यांनी मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलंय. शिवाय, ९२ वर्षीय सासऱ्याने अश्लील हावभाव करत विनयभंग केल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे. दिराने २९ वर्षीय मुलीला तुझी सेटिंग लावून देतो असं म्हटलं. या प्रकरणी पीडित विधवा महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दिली आहे. आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी कविता रुपनर या करत आहेत.