रास्ता पेठेत पैसे वाटप करताना भारती विद्यापीठातील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या उपप्राचार्यासह तिघांना पकडण्यात आल्यानंतर कॉंग्रेस आघाडीचे पुण्यातील उमेदवार विश्वजीत कदम यांच्याविरुद्ध बुधवारी सकाळी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनसेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी संध्याकाळपासून धरणे आंदोलन करून विश्वजीत कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर बुधवारी सकाळी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, विश्वजीत कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पायगुडे यांच्याविरुद्ध प्रचार साहित्य चोरल्याचा आरोप केल्यामुळे त्यांच्याविरुद्धही गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी भारती विद्यापीठाच्या तिघांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून मतदार यादीसह काही साहित्य आणि १६ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. पकडलेले कर्मचारी काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्यासाठी पैसे वाटप करीत होते, अशी तक्रार मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली.
डॉ. सुरेंद्र वेदपाठक, अमोल मुळे आणि उदय चंद्रकांत पाटकर अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, बारा जण पळून गेले आहेत. डॉ. वेदपाठक हे भारती विद्यापीठाच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहेत. तर, मुळे लॅब टेक्निशियन आहे. याबाबत मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांनी सांगितले, की रास्ता पेठेतील पूना कॅफेजवळ विश्वजित कदम यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. त्यानुसार, मनसेचे कार्यकर्ते तिथे गेले. त्यांनी तिघांना जागेवर पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा