देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तीने चप्पल भिरकवल्याची घटना चिंचवडमध्ये घडली. या प्रकरणी चिखली पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक राजकारण चांगलंच तापलं आहे. रविवारी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उदघाटनानिमित्त फडणवीस आले तेव्हा त्यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तीने चप्पल भिरकावली होती.
गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “फालतू लोक….”
पिंपरी-चिंचवड शहरात देवेंद्र फडणवीस हे उदघाटनानिमित शहरात दाखल झाले होते. तेव्हा, राष्ट्रवादीने हाच मुहूर्त साधून गेल्या पाच वर्षात भाजपाने भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करत उद्घाटन होत असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादीने जोरदार निदर्शने केली. दरम्यान, पूर्णानगर येथील अटल बिहारी वाजेपायी उद्यानासमोर राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते, ते एकमेकांसमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते ऐकत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. तेवढ्यात, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा उद्यानात जात होता, तेव्हा अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली.
याप्रकरणी चिखली पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३३६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच एक पथक नेमण्यात आलं आहे.