पुणे : महिलेशी अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी ( आयपीएस ) निलेश अष्टेकर यांच्याविरुद्ध शुक्रवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेच्या भाच्याला पोलीस दलात भरती करण्याचे आश्वासन देऊन अष्टेकर यांनी गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पुणे: विमाननगर भागात मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय – सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; सहा तरुणी ताब्यात
ही महिला मूळची धुळ्याची असून सध्या ती ठाण्यामध्ये वास्तव्याला आहे. विधवा असल्याने प्रपंच चालवण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. धुण्याभांड्याची कामे करून ती उदरनिर्वाह करते. अष्टेकर यांनी तिच्या मोबाइलवर संपर्क साधून तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधला. त्यानंतर व्हिडीओ कॉल करून तिच्याशी असभ्य वर्तन केले. तसेच मुलीबाबतही अश्लीलभाषा वापरली असेही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. अष्टेकर काही वर्षांपूर्वी पुणे शहर पोलीस दलात नेमणुकीस होते. सध्या ते गुप्तवार्ता विभागात कार्यरत आहेत. आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.