पुणे : तहसीलदारांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी संचेती पुलावर आंदोलन करणाऱ्या तरुणाविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणे, अधिकाऱ्याला धमकाविणे आदी कलमाअंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजाविण्यात आली आहे. महेंद्र डावखर (वय २७, रा. बोर बुद्रक, ता. जुन्नर , जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ कुंभार यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा… विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत अखेर राज्य शासनाकडून आदेश… जाणून घ्या काय होणार?
महेंद्र जुन्नर तालुक्यातील असून जमीन नोदणींत तहसीलदारांकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करुन त्याने मंगळवारी (३० मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास संचेती पुलावर आंदोलन सुरू केले. जुन्नर तहसीलदारांवर कारवाई झाली पाहिजे, असा फलक घेऊन त्याने घोषणाबाजी सुरू केली. उड्डाणपुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याची धमकी त्याने दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पुलावरुन सुखरुप खाली उतरविले. महेंद्र याच्याविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करत आहेत.