बारावीची खोटी गुणपत्रिका सादर करणाऱ्या स.प.मधील विद्यार्थ्यांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सुरेखा डांगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यामुळे अखेर विभागीय शिक्षण मंडळ आणि स.प. महाविद्यालयाच्या वादावर पडदा पडला आहे.
बारावीच्या निकालानंतर खोटी गुणपत्रिका देणाऱ्या स.प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबाबत कुणी तक्रार करावी याबद्दल महाविद्यालय आणि पुणे विभागीय मंडळ यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांची तक्रार दाखल करण्याची सूचना महाविद्यालयाने न ऐकल्यामुळे पुणे विभागीय शिक्षण मंडळाने गेल्या महिन्यात महाविद्यालयाची मान्यता काढून घेतली होती. मंडळाच्या या निर्णयाला महाविद्यालयाने उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. महाविद्यालय आणि स.प.च्या या वादामध्ये महाविद्यालय आणि मंडळ या दोघांनी मिळून या विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी असा निर्णय न्यायालयाने दिला होता.
न्यायालयाच्या आदेशानुसार स.प. महाविद्यालयाच्या उप-प्राचार्य सुरेखा डांगे यांनी मंडळाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये विद्यार्थ्यांची फिर्याद दिली आहे. या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांला पुढील पाच सत्रांना परीक्षेला बसण्यास मंडळाने बंदी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा