पिंपरी-चिंचवड येथील कुदळवाडी चिखली येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. कंपनीत कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. तब्बल साडेचार तासानंतर आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण आणले. अक्षय सुरेश बाफना आणि सुरेश दलीचंद बाफना यांच्या मालकीची ही कंपनी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बाराच्या सुमारास पंचशील फिल्टर्स या कंपनीला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भीषण आग लागली. या घटनेची माहिती राजू गर्जे नावाच्या व्यक्तीने अग्निशमन दलाच्या विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. परंतु आग मोठी असल्याने पिंपरी, भोसरी, चिखली, तळवडे, प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी, पुणे मनपा या अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले. मात्र पाणी कमी पडत असल्याने अखेर बजाज कंपनी, टाटा मोटर्स, चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, मोशी या ठिकाणच्या पाण्याचे टँकर पाणी पुरवठा करत होते. असे एकूण १५ ते २० टँकर आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर पहाटे साडेचार वाजता नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीत प्लास्टिक आणि कागदाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर होते. ते आगीत जळून खाक झाले आहे.

या भीषण आगीमुळे कुदळवाडी चिखली परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करावा लागला होता. यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरवर याचा परिणाम झाला होता. या कंपनीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. तसेच कंपनीमध्ये केवळ एकच सुरक्षा रक्षक होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at filter produces company at pimpri chinchwad kudalwadi
Show comments