पुणे : विश्रांतवाडीतील फुलेनगर परिसरात असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात ठेवण्यात आलेल्या दहा वाहनांना रविवारी दुपारी आग लागली. आगीत वाहने भस्मसात झाली असून, आगीमागचे कारण समजू शकले नाही.
हेही वाचा – पुणे : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर
विश्रांतवाडीतील आरटीओ कार्यालयात जप्त करण्यात आलेली वाहने ठेवण्यात आली आहेत. रविवारी दुपारी वाहनांनी पेट घेतला. आगीची माहिती मिळताच येरवडा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीत चार मोटारी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार आराम बस, एक टेम्पो, एक डंपर अशी दहा वाहने जळाली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.