पिंपरी : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये घेतलेल्या ‘मॉक ड्रिल’नंतर महत्त्वाच्या त्रुटी निदर्शनास आल्याने आठ दिवसांत महापालिका इमारतीचे अग्निशामक लेखा परीक्षण (फायर ऑडिट) करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. तसेच चिंचवडमधील एका मॉलमध्ये घेण्यात आलेल्या ‘मॉक ड्रिल’नंतर काही त्रुटी आढळून आल्या असून, शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीस देण्यात येणार आहेत.
महापालिका कार्यालयामध्ये कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास त्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जावे याची चाचपणी घेण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आले. इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या अग्निशामक उपकरणांची, तसेच आपत्कालीन यंत्रणांची या माध्यमातून चाचपणी घेण्यात आली. मात्र, यामध्ये जवानांच्या शिट्यांपेक्षा आगीच्या सूचनेच्या ‘अलार्म’चा आवाज कमी असल्याचे निदर्शास आले, इमारतीमध्ये प्रचंड धूर झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी खाली येताना आपण कोणत्या मजल्यावर आलो आहोत, हे कर्मचाऱ्यांना दिसून येत नव्हते. काही कर्मचारी हे तळमजल्याकडे जात होते. इमारतीमध्ये पाऊस, ऊन, वारा येऊ नये म्हणून टेरेसवर लावण्यात आलेल्या डोममुळे धूरच बाहेर पडत नसल्याचे समोर आले. अशा महत्त्वपूर्ण त्रुटी समोर आल्यानंतर आयुक्त सिंह यांनी पालिका इमारतीचे अग्निशामक लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले.
शहरातील पाच मॉलला नोटीस
महापालिकेच्या वतीने चिंचवडमधील एका मॉलमध्ये घेण्यात आलेल्या ‘मॉक ड्रिल’नंतर काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे शहरातील पाच मोठ्या मॉलना नोटीस देण्यात येणार आहे. महापालिकेने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली की नाही, याची पाहणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा – वर्चस्व राहण्यासाठी सांगवीत हवेत गोळीबार
महापालिका मुख्यालयात ‘मॉक ड्रिल’नंतर काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यानुसार मुख्यालयाचे अग्निशामक लेखा परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर एका महिन्यात आठ क्षेत्रीय कार्यालये, सर्व रुग्णालये, नाट्यगृहे, प्रेक्षागृहांचेही लेखा परीक्षण करण्यात येणार आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिका, अतिरिक्त आयुक्त, प्रदीप जांभळे-पाटील म्हणाले.