पुणे : बालेवाडीतील म्हाळुंगे भागात एका चाळीत मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. आगीत पत्र्याच्या १८ घरांना आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत गृहोपयोगी साहित्य जळाले. म्हाळुंगे परिसरात नानाची चाळीत बैठी पत्र्याची २० घरे आहेत. या चाळीत कष्टकरी राहायला आहेत. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बैठ्या घरात आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेच्या ओैंध अग्निशमन केंद्र, तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलातील जवाानांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. बैठ्या पत्र्याच्या घरातील गादी, कपाट, दूरचित्रवाणी संच, तसेच गृहोपयोगी साहित्य जळाले. घरात कोणी नसल्याने गंभीर दुर्घटना टळली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती ओैंध अग्निशमन केंद्रातील अधिकारी कमलेश सनगाळे यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा