पुणे : चैतन्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेली दिवाळी प्रत्येकाच्याच मर्मबंधातली ठेव. फराळाचा आस्वाद,  शुभेच्छांचा वर्षांव, फटाके उडविण्याचा आनंद लुटण्यातून  दिवाळी साजरी केली जाते. मात्र, या आनंदावर विरजण पडू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान हे दिवाळीमध्येच डोळ्यांत तेल घालून सतर्क राहतात. फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगी, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न केले जातात. अग्निशमन दलातील जवानांची दिवाळी अहोरात्र सेवेत जाते. सामान्यांची दिवाळी सुरक्षित पार पाडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची दिवाळी खऱ्या अर्थाने सार्थकी लागते.

दिवाळीत सामान्य कुटुंब, नातेवाईकांबरोबर रमतो. मात्र, अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी त्यास अपवाद ठरता. दिवाळीत कोणी सुट्टी घ्यायची नाही, असा नियम असतो. त्यामुळे अग्निशमन दलातील प्रत्येक जवान कर्तव्यावर हजर असतो. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या जवानाला सुट्टी मिळते. गंभीर स्वरु पाची घटना घडल्यानंतर सुट्टी घेणाऱ्या जवानाला तातडीने कर्तव्यावर किंवा ‘कॉल’वर (आग लागते ते घटनास्थळ)  हजर व्हावे लागते. दिवाळीचा सण  अग्निशमन दलाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. पावसाळा आणि दिवाळीत जवानांवर जादा ताण असतो, असे पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

दिवाळी सुरू होण्यापूर्वी अग्निशमन दलाकडून तयारी सुरू केली जाते. या काळात अधिकाधिक वाहने म्हणजेच बंब उपलब्ध करावे  लागतात. समजा एखादा बंब  किंवा यंत्रणा नादुरुस्त असेल तर ती दिवाळीपूर्वीच दुरुस्त करून घ्यावी लागते. पुणे अग्निशमन दलाचे शहरातील वेगवेगळ्या भागात चौदा केंद्र आहेत. तेथील अधिकारी, तेथील यंत्रणेची माहिती घ्यावी लागते. आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यानंतर तातडीने काय उपाययोजना करता येईल, याचा आढावा बैठकीत घेण्यात येतो. भवानी पेठेत मुख्य अग्निशमन केंद्र आहे. तेथील बिनतारी संदेश यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवावी लागते. नियंत्रण कक्षातील कामकाज सुरळीत चालले असल्याची खातरजमा करावी लागते. शहर तसेच उपनगरातील प्रत्येक केंद्रातील पाण्याच्या टाक्या पूर्णपणे भरल्या जातील, याची काळजी घेतली जाते. एका वेळी अनेक ठिकाणी आग लागली तर त्याचे नियोजन व मनुष्यबळ कसे उपलब्ध करून द्यायचे याचाही आढावा घेतला जातो. अग्निशमन दलात अधिकारी तसेच जवान मिळून साडेचारशेजणांचे मनुष्यबळ आहे, असे त्यांनी सांगितले.

फटाके विरहित दिवाळीला उत्तम प्रतिसाद

गेल्या काही वर्षांपासून शहरातील विविध सामाजिक संस्थांकडून फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयातदेखील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जाते. त्यामुळे फटाके वाजविण्याचा कल कमी होत चालला आहे. यंदा सर्वोच्च न्यायालयाने  फटाके उडवण्यासाठी विशिष्ट वेळेचे बंधन घालून दिले आहे. निर्देश दिल्यानंतर फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या फटाके विक्रीची दुकाने शहरातील वेगवेगळ्या भागात आहेत. तेथे आग लागल्यास गंभीर स्वरुपाची दुर्घटना घडू शकते. त्यामुळे या काळात विशेष काळजी घ्यावी लागते, असे रणपिसे यांनी नमूद केले.

सर्वाधिक ‘कॉल’लक्ष्मीपूजनाला

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री मोठय़ा प्रमाणावर आतषबाजी केली जाते. घराच्या छतावर पडलेला पालपोचाळा, झाडांवरच्या फांद्या तसेच एखादी गंभीर स्वरूपाची घटना घडल्यानंतर तातडीने तेथे धाव घ्यावी लागते. गेल्या वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात चौदा ठिकाणी आग लागली होती, असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.