पिंपरी : चिखलीतील कुदळवाडी येथील भंगार गोदामांना सोमवारी सकाळी लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असले तरी दोन तास उलटल्यानंतरही ही आग अजुनही धुमसतच आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तैनात असून सातत्याने पाण्याचा मारा केला जात आहे. आग पूर्णपणे आटोक्यात येण्यास आणखी एक दिवस लागेल, अशी माहिती अग्निशमन विभागाचे उपायक्त मनोज लोणकर यांनी दिली.
चिखलीतील कुदळवाडी येथील भंगार गोदामांना सोमवारी सकाळी भीषण आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे २० अग्निशमन बंब तसेच, पुणे महापालिका, पीएमआरडीए, टाटा मोटर्स कंपनीच्या बंबांसह अनेक खासगी टँकरच्या मदतीने सायंकाळपर्यंत आग काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत पन्नासहून अधिक गोदामे भस्मसात झाली. आग धुमसत असल्याने पाणी फवारण्याचे काम अद्यापही सुरू ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा…खासगीकरणाचे लोण महापालिकेपर्यंत; जलतरण तलावांचे खासगीकरण
सुमारे चार एकर परिसरातील ही गोदामे जळून खाक झाली आहेत. या गोदामांमध्ये प्लॅस्टिक, लाकुड, रबर, टायर, फायबर, केमीकल असे विविध प्रकारचे भंगार साहित्य आहे. या भागातील सर्व गोदामे अनाधिकृत आहेत. आगीत भस्मसात झालेल्या या रिकाम्या जागेवर यापुढील काळात अनाधिकृत गोदामे उभी राहू दिली जाणार नाहीत. या जागेचा मालक नेमका कोण आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मालकाची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असेही लोणकर यांनी स्पष्ट केले.