लष्कर भागातील इस्ट स्ट्रीट परिसरातील एका अनाथलयात मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाने अनाथलयातील १०० मुलांना सुखरुप बाहेर काढले.इस्ट स्ट्रीट परिसरात तय्यबिया मुलांचे अनाथलय आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास अनाथलयात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्राला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलातील देवदूत वाहन, बंब घटनास्थळी दाखल झाले. अनाथलय चार मजली आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने मुले घाबरली होती. जवानांनी १०० मुलांना सुखरुप बाहेर काढले. पाण्याचा मारा करुन दहा मिनिटात आग आटोक्यात आणली.
हेही वाचा >>>पुणे: कोथरूडमध्ये लोकसहभागातून पावसाळी चेंबरच्या झाकणांची दुरुस्ती
अनाथलयातील तळमजल्यावर धान्याचा साठा तसेच अन्य काही साहित्य होते. आगीमुळे धान्याचा साठा, अन्य साहित्याचे नुकसान झाले. आग मोठी नव्हती. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली.केंद्र प्रमुख प्रदीप खेडेकर, अतुल माेहिते, चंद्रकांत गावडे, आझम शेख, गौरव कांबळे, पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचे तांडेल आसिफ शेख, ओंकार ससाणे, प्रमोद चव्हाण आदींनी आग आटोक्यात आणली.