कोथरूडच्या डावी भुसारी कॉलनी परिसरातील शेडला बुधवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत आत्तापर्यंत चारजणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. येथील मयुरेश डायनिंग हॉल या खानावळीत वेल्डिंगचे काम सुरू असताना झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली. वेल्डिंग सुरू असताना पडलेल्या ठिणगीमुळे वेल्डिंग करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या सिलेंडरसह संपूर्ण मशिनचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की या खानावळीच्या छतावरील काही पत्रे उडाले. याच पत्र्यांखाली आणखी काही मृतदेह असण्याची शक्यता आहे. या स्फोटानंतर खानवळीत असणाऱ्या गाद्यांमुळे आग पसरत गेली आणि थोड्याचवेळात आगीने भीषण स्वरूप धारण केले. दरम्यान, ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. मात्र, या संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला असून पोलीस आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
कोथरूडच्या डावी भुसारी कॉलनीत भीषण आग; चौघांचा मृत्यू
अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
Written by रोहित धामणस्कर
Updated:
First published on: 16-12-2015 at 19:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire broke out in kothrud pune