लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी शहरातील वेगवेगळ्या भागात ३१ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या, तसेच सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहर, तसेच उपनगरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात येते. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी सात ते रात्री नऊ यावेळेत शहरात ३१ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या. सुदैवाने आगीच्या घटनांमध्ये कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
हेही वाचा >>> सहाशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जगण्याचा संघर्ष अखेर यशस्वी!
आळंदी रस्त्यावरील कळस गावात कचऱ्यावर पेटता फटका पडल्याने आग लागण्याची घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मांजरीतील मोरे वस्ती परिसरात उसाच्या शेतात फटाका पडल्याने आग लागली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर अग्निशमन दलाच्या केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी पाण्याचा मारा करनु आग आटोक्यात आणली. बालेवाडीतील काका हलवाई मिठाई दुकानासमोर पेटता फटका पडल्याने महावितरणच्या विद्युत तारेने पेट घेतला. कोथरुड येथील रामबाग कॉलनीत पेटता फटका पडल्याने झाडाने पेट घेतला.
हेही वाचा >>> ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट! वाहतूक पोलिसांमुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रीपेड रिक्षा बूथ बंद
मार्केट यार्डातील प्रवेशद्वार क्रमांक पाच परिसरात लावलेल्या वाहनातील कचऱ्याने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सहकारनगर पोलीस चौकीजवळ एका नारळाच्या झाडाला आग लागली. बंडगार्डन रस्ता परिसरातील मंगलदास चौकीजवळ एका झाडाला आग लागली. गणेश पेटेतील बुरुड आळीत ताडीपत्रीवर पेटता फटका पडल्याने आग लागली. रविवार पेठेतील तांबाेळी मशिदीजवळ कपड्याच्या दुकानात फटाक्याची ठिणगी उडून आग लागली. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रकवर पेटता फटका पडल्याने आग लागली. लक्ष्मी रस्त्यावरील विजय चित्रपटगृहाजवळ एका घराच्या छतावर पेटता फटका पडल्याने आग लागली. टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळाजवळ एका झाडाला आग लागली, तसेच आळंदी रस्त्यावरील कळस स्मशानभूमीजवळ असलेल्या शेतात फटाक्यांमुळे आग लागली. कात्रजमधील संतोषनगर परिसरात एका घराच्या गॅलरीत पेटत्या फटाक्यामुळे आग लागली.