लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : शहरातील औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक, संस्थात्मक, वैद्यकीय मालमत्तांचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण महापालिकेच्या अग्निशामक विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. महिला बचत गटांमार्फत माहिती संकलित केली जाणार आहे.
सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. या सर्वेक्षणातून शहरात व्यावसायिक मालमत्ता किती आहेत, मालमत्तेबाबतचे परवाने याबाबत माहिती एकत्रित केली जाणार आहे. उपयोजनच्या (ॲप) माध्यमातून अग्निशामक यंत्रणा उपलब्धतता, मालमत्तांचे छायाचित्रे, विविध परवान्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनंतर मालमत्ता सुरक्षेबाबत अग्निशामक विभागाकडून महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत. सर्वेक्षणासाठी महापालिका अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांच्या महिला प्रतिनिधींचे ओळखपत्र पाहून मालमत्तेबाबत विविध परवाने, नोंदणी प्रमाणपत्रे आदी आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले.
परवान्यांची माहिती द्यावी लागणार
अन्न व औषध परवाना, महापालिकेचा साठा व विक्री, व्यवसाय परवाना, वीज बिल, इमारतीचा बांधकाम, व्यवसाय संबंधित अग्निशामक ना हरकत दाखला या परवान्यांची माहिती द्यावी लागणार आहे.
शहरात झपाट्याने औद्योगिक, व्यावसायिक मालमत्ता वाढत आहेत. नागरिकांच्या व व्यावसायिक मालमत्तांच्या सुरक्षेसाठी अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण केले जात आहे. -प्रदीप जांभळे, प्रभारी आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका