पुणे : दुचाकीच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांनी उपनगरात उच्छाद मांडला आहे. उपनगरात गुंड प्रवृत्तीचे तरुण फटाक्यांसारख्या आवाज काढणाऱ्या दुचाकींची फेरी काढून दहशत माजवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. रात्री-अपरात्री फटाक्यांसारख्या आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ कारणांवरून दोन गटांत हाणामारी होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. दहशत माजविण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे तरुण रात्री-अपरात्री दुचाकींच्या फेऱ्या काढत आहेत. दुचाकींच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखे आवाज येत असल्याने नागरिक भयभीत होतात. फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी येरवडा, फुलेनगर, हरिगंगा सोसायटीच्या परिसरातून गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी दुचाकी फेरी काढली होती. या भागात दोन गुंड टोळय़ांमध्ये वाद असून दहशत माजविण्यासाठी दुचाकी फेरी काढण्यात येते, अशा तक्रारी हरिगंगा सोसायटीतील रहिवाशांनी केल्या आहेत. कात्रज, कोंढवा, वारजे, कोथरूड, हडपसर भागात गुंड प्रवृत्तीचे तरुण रात्री-अपरात्री दुचाकी फेऱ्या काढत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दुचाकी फेऱ्या काढणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
इंदोरी फटाका म्हणजे काय ?
दुचाकींच्या सायलेन्सरमधून फटाका किंवा गोळी झाडल्यासारखा आवाज निर्माण होतो. शहरातील काही गॅरेज चालक सायलेन्सरमध्ये असे बदल करून देतात. फटाक्यासारखे आवाज काढणारे सायलेन्सर पररराज्यातून येतात. अशा प्रकारच्या सायलेन्सरला इंदोरी फटाका असे म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी गुन्हे शाखेने फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्या सायलेन्सरचे विक्रेते तसेच गॅरेज चालकांविरोधात कारवाई केली होती.
दुचाकींच्या सायलेन्सरमधून आवाज काढणे बेकायदा आहे. फटाक्यासारखे आवाज काढणारे दुचाकीस्वार दिसल्यास वाहतूक शाखेच्या सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग