सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांपैकी ६५ टक्के महाविद्यालये असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांपैकी फक्त ३०० महाविद्यालयांमध्येच अग्निप्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध आहे. दोन वर्षांपूर्वीच महाविद्यालयांना अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आलेले असतानाही महाविद्यालये आणि विद्यापीठांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
महाविद्यालयांसाठी अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवणे बंधनकारक असल्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यापीठाने महाविद्यालयांनी ही यंत्रणा बसवली आहे का, याची माहिती घेऊन नियमाचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणे अपेक्षित होते. अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न आल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने विद्यापीठांकडे माहिती मागवली होती.
प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ८४० महाविद्यालयांपैकी फक्त ३०० महाविद्यालयांमध्येच अग्निप्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये ही यंत्रणा उपलब्ध नाही, त्यांच्यावर विद्यापीठाने किंवा प्रशासनानेही आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. महाविद्यालयांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा असणे ही बाब प्राथमिक सुविधांमध्ये येते. पिण्याचे पाणी असणे, स्वच्छतागृह असणे याप्रमाणेच प्रत्येक इमारतीमध्ये निकषांनुसार अग्निप्रतिबंधक यंत्रणा असणेही आवश्यक आहे. त्याबाबतचा निर्णयही शासनाने दोन वर्षांपूर्वीच जाहीर केला आहे. त्याप्रमाणे महाविद्यालयांची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक समितीने (एलआयसी) या बाबीचीही पाहणी करणे आवश्यक आहे. मात्र, ही यंत्रणा नसलेल्या महाविद्यालयांबाबत अहवाल देताना आजपर्यंत एकाही समितीने प्राथमिक सुविधा पुरेशी नसल्याचा अहवाल दिलेला नाही, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या महाविद्यालयांकडे यंत्रणा आहे, त्यांच्याकडेही यंत्रणा कशाप्रकारे उभारण्यात आली आहे, सर्व निकष पाळण्यात आले आहेत का, ती अद्ययावत आणि कार्यरत आहे का, महाविद्यालयाच्या क्षमतेनुसार ती पुरेशी आहे का याची पाहणीही करण्यात आलेली नाही.
यंत्रणा नाहीच.. काळजीही नाही
शाळा, महाविद्यालये किंवा मोठय़ा प्रमाणात वर्दळ असलेल्या इमारतींमध्ये काही दुर्घटना घडू नये, यासाठी काय काळजी घ्यावी याची मार्गदर्शक तत्त्वे अग्निशामन विभागाकडून देण्यात आली आहेत. मात्र, अनेक महाविद्यालयांमध्ये त्याच्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महाविद्यालयाचे उपाहारगृह इमारतीपासून दूर असावे, जिने व दारे रुंद असावीत, आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी मार्ग असावा, त्याची माहिती देणारे मार्गदर्शक फलक दिसतील अशा जागी लावण्यात यावेत, जिन्याखाली अडगळ किंवा रद्दी साठवण्यात येऊ नये, महाविद्यालयांच्या आवारात धूम्रपान करण्यात येऊ नये, अशा काही सूचना अग्निशामक विभागाने दिल्या आहेत, मात्र महाविद्यालयांकडून या सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा