अग्निशमन दलासाठी होत असलेल्या ९० लाख रुपयांच्या खरेदीत महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याचे पुरावे सादर झाल्यानंतरही स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही. महापालिकेची तिजोरी सांभाळणाऱ्या स्थायी समितीनेच खरेदीचा ठराव मंजूर केलेला असल्यामुळे खरेदीतील गैरप्रकाराबाबत चर्चा होत नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
अग्निशमन दलासाठी प्रत्येकी २९ हजार ४०० रुपये किमतीची ३०० हेल्मेट खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने एकमताने घेतला आहे. या खरेदीबाबत प्रथमपासूनच आक्षेप घेतले जात होते. तसेच या खरेदीत महापालिका तब्बल ३९ लाख रुपये जादा मोजणार असल्याची तक्रार नुकतीच आयुक्तांकडे पुराव्यांनिशी सादर करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर तरी स्थायी समिती या विषयाची दखल घेऊन त्याबाबत चौकशी करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मंगळवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये या खरेदीबाबत कोणीही चर्चा उपस्थित केली नाही वा काही आक्षेपही नोंदवला नाही.
महापालिका जी हेल्मेट खरेदी करणार आहे, त्यांचा भारतातील दर व पुण्यातील कर यांचा विचार करता ही खरेदी प्रतिहेल्मेट १६ हजार ४०० रुपये या दराने होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात तेच हेल्मेट २९ हजार ४०० रुपयांना महापालिका खरेदी करत आहे. या  खरेदीसंबंधीचा प्रस्ताव नक्की कोणी तयार केला होता आणि तो तयार करताना इतर अनेक गोष्टी का विचारात घेण्यात आल्या नाहीत, याचाही खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्याबाबतही मौन बाळगण्यात आले आहे.

Story img Loader