भवानी पेठेतील विशाल अपार्टमेन्टच्या लिफ्टच्या डक्टमध्ये एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. दुर्गंधी सुटल्यामुळे हा प्रकार लक्षात आला. अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला. पाचव्या मजल्यावरील लिफ्टच्या दरवाजाला थोडी फट असल्यामुळे त्यातून ते पडले असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. मात्र, या ठिकाणी हा मृतदेह कसा गेला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
शब्बीर यायाभाई गिलीटवाला (वय ६५, रा. औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बेपत्ता असल्याची तक्रार १२ जून रोजी समर्थ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीरभाई यांचे नातेवाईक विशाल अपार्टमेन्टमध्ये राहतात. शनिवारी सकाळी नागरिकांनी लिफ्ट डक्टमधून दुर्गंधी येत असल्यामुळे पाहिले असता एका व्यक्तीचा मृतदेह आतमध्ये असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलास फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार केंद्र प्रमुख प्रकाश गोरे हे रेस्कू व्हॅन घेऊन तिथे गेले. विशाल अपार्टमेन्ट ही सहा मजली इमारत आहे. मृतदेह बाहेर काढताना अग्निशामक दलाच्या जवानांना अनेक अडचणी आल्या. शेवटी मृतदेहाच्या कमरेला दोरी बांधून तो बाहेर काढण्यात आला. गिलीटवाला यांच्या जावयाने हा मृतदेह त्यांचाच असल्याचे ओळखले. हा मृतदेह तीन ते चार दिवसांपासून या ठिकाणी असल्यामुळे दुर्गंधी सुटली होती.
गिलीटवाला गुरूवारी सकाळी विशाल अपार्टमेन्ट येथे नातेवाईकांकडे आले होते. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता परत त्यांच्या मेव्हण्याकडे जातो म्हणून बाहेर पडले, तेव्हापासून ते बेपत्ता होते. त्यांचा शनिवारी सकाळी मृतदेह सापडला. हा मृतदेह लिफ्ट डक्टमध्ये कसा पडला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. हा खून आहे की अकस्मात मृत्यू याची माहिती पोलीस घेत आहेत. पाचव्या मजल्यावरील लिफ्टच्या दरवाजाला थोडी फट असल्यामुळे त्यातून ते पडले असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा