पुणे : पुणे शहरातील मुंढवा येथील पुलाखाली नदीमध्ये एक तरुण अडकल्याची घटना घडली. या घटनेतील तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे.
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील पुलाखाली नदी मध्ये आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास एक तरुण नदीच्या मधोमध अडकला होता. याबाबतची माहिती अग्निशामक विभागास प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचताच जवानांना नदीच्या मधोमध एक तरुण पाण्यात अडकलेला आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.
जवानांनी तातडीने रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंगच्या साह्याने पाण्यात उतरत, त्या तरुणाजवळ जाऊन त्याला धीर देत त्याच्याशी संवाद साधला आणि त्याला अवघ्या पंधरा मिनिटातच सुखरुप पाण्याबाहेर काढले. तिथे उपस्थित त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले असून तो तरुण तिथे कसा पोहोचला ही माहिती मिळू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.