पुणे : बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अग्निसुरक्षा रामभरोसे असल्याची बाब उघडकीस आली आहे. महाविद्यालयातील अग्निशमन उपकरणे मुदतबाह्य झाली असून, गेल्या नऊ महिन्यांपासून ही उपकरणे निकामी अवस्थेत आहेत.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळमजल्यावर अधिष्ठाता कार्यालय आहे. या इमारतीच्या अधिष्ठाता कार्यालयाच्या दर्शनी भागासह व्हरांड्यात ठिकठिकाणी अग्निशमन उपकरणे लावली आहेत. या अग्निशमन उपकरणांमध्ये आग विझविणारी रसायने भरलेली असतात. एकदा रसायने भरल्यानंतर त्याची मुदत वर्षभरासाठी असते.
महाविद्यालयातील अग्निशमन उपकरणांमध्ये २० जुलै २०२३ रोजी रसायने भरण्यात आली होती. त्यांची मुदत १९ जुलै २०२४ पर्यंत होती. मात्र, त्यानंतर अद्यापपर्यंत ९ महिन्यांत या अग्निशमन उपकरणांमधील रसायने भरण्यात आलेली नाहीत. या कालावधीत महाविद्यालयात एखादी आगीची दुर्घटना घडलेली नाही. अशी घटना घडल्यास आजही ही अग्निशमन उपकरणे आग विझविण्यास निकामी आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.
याबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले, ‘महाविद्यालयासह ससून सर्वोपचार रुग्णालयात अग्निशमन उपकरणांऐवजी फायरबॉल बसविण्याचा प्रस्ताव आहे. खासगी कंपन्याच्या सामाजिक दायित्व निधीतून हे करण्याचे विचाराधीन आहे. लवकरच यावर कार्यवाही केली जाईल.’
याबाबत वैद्यकीय उपाध्यक्ष डॉक्टर सोमनाथ खेडकर म्हणाले की, अग्निशमन उपकरणांतील रसायने भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. ससून सवोपचार रुग्णालयातील अग्निशमन उपकरणांतील रसायने भरण्यात आलेली आहेत. परंतु बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अग्निशमन उपकरणांतील रसायने भरलेली नाहीत. लवकरात लवकर ती भरण्याचा पाठपुरावा केला जात आहे.
अग्निशमन उपकरणांची तपासणी करून त्यांची मुदत तपासायला हवी. आम्ही अग्निसुरक्षा तपासणी करताना या बाबींवर भर देतो. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अग्निशमन उपकरणांची मुदत संपली असल्यास त्यांना याबाबत योग्य सूचना केल्या जातील. -देवेंद्र पोटफोडे, प्रमुख, अग्निशमन विभाग, महापालिका