पिंपरी: दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली जात आहे. लक्ष्मीपूजनानंतर रविवारी शहर, उपनगरात मोठ्या प्रमाणावर केलेल्या आतिषबाजीमुळे शहरातील विविध १८ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ११ ठिकाणी घरांना आग लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला.

दिवाळीनिमित्त फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली जात आहे. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत दिवसभर फटाके फोडले जात आहेत. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. रविवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर शहरासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या आतिषबाजीमुळे शहरातील १८ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.

हेही वाचा… प्रवाशांसाठी खुशखबर! गर्दी कमी करण्यासाठी दिवाळीत रेल्वेच्या ५०० विशेष गाड्या

जुनी सांगवी, पिंपळे सौदागर, वाकड, फुगेवाडी, कासारवाडी, काळेवाडी, भोसरीतील पहिल्या मजल्यावरील घराला आग लागली होती. रावेत येथे एका दुकानाला आग लागली. चिखलीत चौथ्या मजल्यावरील घराला आग लागली. वडमुखवाडीत सलूनच्या दुकानाला आग लागली. आकुर्डी, एम्प्यायर इस्टेट येथील सातव्या मजल्यावरील घराला आग लागली. पिंगळेसौदागर येथे झाडाला आग लागली होती. मोरवाडीत घराला तर मोशीत एका कंपनीला आग लागली. पिंपरी बाजारपेठेतील एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. दापोडीत एका घराला आग लागली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही. अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला.सातत्याने येणाऱ्या वर्दीमुळे अग्निशमन विभागाच्या जवानांची मात्र मोठी धावपळ झाली.

Story img Loader