पुणे : मावळमधील चांदखेड येथे भर दिवसा हवेत गोळीबार केल्याने एकच गोंधळ उडाला. गावात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने दारूच्या नशेत असलेल्या अविनाश गोठे याने हा गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश गोठेसह चार जाणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही आणि मोबाईलमध्ये कैद केलेला व्हिडिओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहशत पसरविण्याच्या हेतून हा गोळीबार केल्याची माहिती शिरगाव पोलिसांनी दिली. अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपी अविनाश गोठेवर याअगोदर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. 

हेही वाचा – ‘१०८’ रुग्णवाहिकेने नऊ वर्षांत वाचवले ८१ लाखांहून अधिक रुग्णांचे प्राण, राज्यातील ३८,४६४ बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील चांदखेड येथे यात्रा असल्याने तालुक्यातून अनेक नागरिक यात्रेसाठी आले होते. चांदखेड परिसर गर्दीने गजबजून गेला होता. याच गर्दीचा फायदा आणि गावात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने दारूच्या नशेत असलेल्या अविनाश गोठेने गर्दीत पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला. सुदैवाने हवेत गोळीबार केल्याने कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

हेही वाचा – मुंबई : म्हाडा सोडतीची नोंदणी आता आणखी सोपी

शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ आणि सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी अवघ्या काही तासांत या प्रकरणी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ग्रामीण परिसरातील अशा प्रकारची गुन्हेगारी मोडीत काढणे हे पिंपरी- चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing in the air during a yatra in pune maval kjp 91 ssb