पुणे : वादातून नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात गुरुवारी रात्री पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. गोळीबार करणाऱ्या आरोपींनी एकाला दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली.
याप्रकरणी गणेश संजय चैाधरी (वय २९), ओंकार अंकुश लांडगे (वय २५, दोघे रा. वाडेबोल्हाई) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजित महादेव जाधव (वय २६, रा. जाधव वस्ती, बकोरी, ता. हवेली) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारहाणीत जुनैद शेख जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश चौधरी आणि अजित जाधव यांच्यात वाद झाला होता. त्या वेळी अजितने गणेशच्या कानशिलात लगावली होती. तेव्हापासून गणेश हा अजितवर चिडून होता. वाद मिटविण्यासाठी गणेश आणि अजित मित्रांना घेऊन गुरुवारी (१३ मार्च) नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात आले. वाडेबोल्हाई मंदिराजवळ रात्री साडेबाराच्या सुमारास अजित आणि गणेश यांच्यात पु्न्हा बाचाबाची झाली. त्या वेळी वाडेबोल्हाई मंदिराजवळून चौघे जण तेथे आले. त्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर दाेन्ही गटातील तरुण पळाले. जाधव याचा मित्र जुनैद शेख दुचाकीवर थांबला होता. त्याला दांडके, तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
गोळीबाराची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, सहायक निरीक्षक रवींंद्र गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी गणेश आणि साथीदार ओंकार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत, अशी माहिती सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी दिली.