पुणे : सराईत गुन्हेगार पच्चीस उर्फ फैजान रमजान शेख ( वय. २१, रा. सय्यद नगर कोंढवा) याच्यावर दुचाकीवरून आलेल्या एकाने पिस्तुलातून गोळीबार केला. ही घटना गुलामअलीनगर महंमदवाडी भागात घडली. त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून, पोटात गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. सुरुवातीला त्याच्यावर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सासवड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पच्चीस हा गुलामअलीनगर मंहंमदवाडी परिसरातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एकाने त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यामध्ये तो जखमी झाला. एका व्यक्तीने पोलिसांना गोळीबाराची माहिती दिली.