‘रंगमंचावरील एक तासाचा सिनेमा’ अशी ओळख मिळवलेली फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारपासून (९ फेब्रुवारी) सुरू होत असून पूर्व प्राथमिक फेरीचे आव्हान पार करून २९ संघ प्राथमिक फेरीत दाखल झाले आहेत. या वर्षीही प्राथमिक फेरीत अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या जास्त आहे.
सामाजिक आर्थिक विकास संस्था आणि स्वप्नभूमी या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा जल्लोष सुरू झाला आहे. या स्पर्धेच्या पूर्व प्राथमिक फेरीतून २९ संघ प्राथमिक फेरीत दाखल झाले आहेत. या वर्षी पूर्व प्राथमिक फेरीत ४४ संघ सहभागी झाले होते. नृत्य, नाटय़, संगीत, इतर कला आविष्कार, शिल्पकला, चित्रकला, अ‍ॅनिमेशन, पपेट शो, श्ॉडो प्ले अशा अनेक कलाप्रकारांचा संगम साधून स्पर्धकांनी आपल्या विषयांची मांडणी केली. या वर्षीही या स्पर्धेवर सामाजिक विषयांचाच प्रभाव दिसत आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत अण्णा भाऊ साठे नाटय़गृह येथे होणार आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सादरीकरणाने या फेरीची सुरुवात होणार आहे. रोज सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान चार प्रयोग आणि सायंकाळी ४ ते ७.३० या वेळेत ३ प्रयोग असे एका दिवशी ७ प्रयोग सादर होणार आहेत. प्राथमिक फेरीतून ७ ते ९ महाविद्यालयांची अंतिम फेरीत निवड करण्यात येणार असून १७ फेब्रुवारीला स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.