पुणे : सर्व कलांचा संगम घडवणारी अनोखी फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षांत फिरोदिया करंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांचा मेळावा, स्पर्धेच्या वाटचालीचा आढावा घेणारा माहितीपट, स्मरणिका असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्यकांत कुलकर्णी यांनी १९७४ मध्ये फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धा सुरू केली. फिरोदिया या उद्योजक कुटुंबाकडून या स्पर्धेसाठी पाठबळ मिळाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे ही स्पर्धा रूजत गेली. नाट्य, संगीत, कविता या पासून ते दोरीवरच्या कसरतींपर्यंत अशा विविध कलाप्रकार फिरोदिया करंडक स्पर्धेच्या मंचावर येतात. वेगवेगळ्या कलाप्रकारांना एका संकल्पनेत गुंफून त्याचे सादरीकरण या स्पर्धेत केले जाते. त्यामुळे पारंपरिक एकांकिका स्पर्धांपेक्षा अत्यंत वेगळी ओळख फिरोदिया करंडक स्पर्धेने प्राप्त केली आहे. रंगमंचावरचा सिनेमा असे या स्पर्धेचे वर्णन केले जाते. गेल्या पन्नास वर्षांत फिरोदिया करंडक स्पर्धेने अभिनेते, गायक, संगीतकार, दिग्दर्शक, लेखक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे फिरोदिया करंडक स्पर्धेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

स्पर्धेचे संयोजक असलेल्या सामाजिक आर्थिक विकास संस्था स्वप्नभूमीचे अजिंक्य कुलकर्णी म्हणाले, की यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या फिरोदिया करंडक स्पर्धेची पूर्वप्राथमिक फेरी ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. तर १४ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत प्राथमिक फेरी, २४ आणि २५ फेब्रुवारीला अंतिम फेरी होणार आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने २ आणि ३ मार्चला फिरोदिया करंडक स्पर्धेतील कलाकारांचा मेळावा होणार आहे. त्यावेळी जुन्या पिढीच्या, नव्या पिढीच्या कलाकारांचे सादरीकरण होणार आहेत. त्याच दिवशी स्पर्धेचा ५० वर्षांचा प्रवास उलडणारा माहितीपट आणि स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याशिवाय पन्नास वर्षांतील निवडक ५० कलाकारांच्या मुलाखती प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

हेही वाचा : नाट्य, कलासंस्कृतीला उभारी; ठाण्यातील नाट्यगृहांच्या भाडेदरात कपात; नववर्षी नाट्यसंस्थाना दिलासा

स्पर्धा राज्यभरात व्हावी…

फिरोदिया करंडक स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळात विविध गुणदर्शन असे त्याचे स्वरुप होते. मात्र, एका संकल्पनेत सर्व कला प्रकार गुंफणे हे स्वरूप स्पर्धा सुरू झाल्यावर पंधरा वर्षांत आले. आज या स्पर्धेत होणारी सादरीकरणे फारच उच्च दर्जाची असतात. ही स्पर्धा पन्नास वर्षे पूर्ण करते याचा खूपच आनंद आहे. राज्यभरातून लोक ही स्पर्धा पाहायला येतात आणि सादरकीरणे पाहून अक्षरश: चकित होतात. ही स्पर्धा पुण्यापुरती न ठेवा राज्यभरात न्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पन्नास वर्षांचा मोठा टप्पा झाल्यावर आता फिरोदिया करंडक राज्यभरात व्हावी, असे मला वाटते, अशी भावना सूर्यकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firodia karandak competition pune print news ccp 14 pbs
Show comments