पहिल्या आयुर्वेद मॉलचे पुण्यात उद्घाटन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुग्णाचे विकार नष्ट करणे आणि निरोगी माणसाचे आरोग्य चांगले ठेवणे हे आयुर्वेदाचे महत्त्व चरकसंहितेत सांगितले आहे. आयुर्वेदाचा हा वसा ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. सदानंद सरदेशमुख यांच्या दहा पिढय़ांनी जपला आहे, असे गौरवोद्गार उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी रविवारी काढले.

अथर्व नेचर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आयुर्वेद ग्राम या आयुर्वेद मॉलचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते झाले. डॉ. सदानंद सरदेशमुख, खासदार अनिल शिरोळे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे डॉ. पी. डी. पाटील तसेच डॉ. सुकुमार सरदेशमुख या वेळी उपस्थित होते.   सरदेशमुख यांच्याशी माझा ५० वर्षांचा स्नेह आहे. १९९३ मध्ये कर्करोगाचे निदान झाल्यावर केमोथेरपीसारखे उपचार घेतले.

पण केमोथेरपीचे दुष्परिणाम शरीरावर होऊ नयेत म्हणून सरदेशमुख यांच्या आयुर्वेदिक औषधांचा आपल्याला लाभ झाल्याचे नाईक यांनी सांगितले.

डॉ. सदानंद सरदेशमुख म्हणाले, आयुर्वेदाला जगाच्या नकाशावर नेण्याच्या उद्देशाने डॉ. सुकुमार सरदेशमुख यांच्या कल्पनेतून आयुर्वेद ग्राम साकारले. आयुर्वेदिक औषधांचे अनेक प्रकार, बाजारातील कंपन्यांची आयुर्वेदिक उत्पादने येथे एकाच छताखाली विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आयुर्वेदिक कॅफे, आयुर्वेदिक थेरपी, स्पा सेंटर, आयुर्वेदिक औषधोपचारांवरील पुस्तके, असे आयुर्वेदाशी संबंधित सगळे काही इथे असल्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसे वाचतील आणि स्वस्त आयुर्वेदिक उपचार उपलब्ध होतील. शिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. सदानंद सरदेशमुख यांना धन्वंतरी पुरस्कार

केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि इंटिग्रेटेड कॅन्सर केअर ट्रीटमेंटचे संस्थापक डॉ. सदानंद सरदेशमुख यांना यंदाचा धन्वंतरी पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती राम नाईक यांनी दिली. धन्वंतरी दिनानिमित्त मंगळवारी (१७ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First ayurveda mall inaugurated in pune by ram naik