विद्याधर कुलकर्णी
साहित्यामध्ये डी. लिट.चे पहिले भारतीय मानकरी
‘प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई’ या कवितेने मराठी मनावर अधिराज्य करणारे.. गज़ल आणि रुबाई हे काव्यप्रकार मराठीमध्ये आणणारे.. रविकिरण मंडळातील ‘रवि’ अशी अफाट लोकप्रियता लाभलेले.. कवी माधव ज्यूलियन ऊर्फ ज्येष्ठ समीक्षक प्रा. माधवराव पटवर्धन यांना मराठी भाषेतील पहिल्या डॉक्टरेटचे मानकरी हा बहुमान लाभला त्या घटनेला शनिवारी (१ डिसेंबर) ऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत.
प्रा. माधवराव पटवर्धन यांच्या ‘छंदोरचना’ या ग्रंथाला मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी. लिट. देण्याचा निर्णय घेतला. ग्रंथासाठी डॉक्टरेट देण्याची मराठी भाषेतील ही पहिलीच घटना ठरली. हा बहुमान माधव ज्यूलियन यांना लाभला, त्या घटनेला शनिवारी ऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय भाषांमध्ये साहित्य विषयातील डी. लिट. संपादन करणारे माधव ज्यूलियन हे पहिले मानकरी ठरले असून, त्यांच्या माध्यमातून मराठी भाषेला हा बहुमान लाभला आहे. ‘मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे’ या कवितेने लोकप्रिय झालेल्या माधव ज्यूलियन यांच्यामुळे मराठी वैभवाच्या शिरी गेली. मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद या आद्य साहित्य संस्थेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. हे त्यांचे योगदान ध्यानात घेऊन परिषदेच्या सभागृहाचे माधवराव पटवर्धन असे नामकरण करण्यात आले आहे.
बडोदा येथे २१ जानेवारी १८९४ रोजी माधवराव यांचा जन्म झाला. त्यांनी फारसी भाषेमध्ये बी. ए. आणि इंग्रजी साहित्य विषयामध्ये एम. ए. पदवी संपादन केली. इंग्रजी कवी शेले याच्या ‘ज्यूलियन आणि मडालो’ या कवितेवरून त्यांनी ‘ज्यूलियन’ हे नाव धारण केले. शिक्षणानंतर १९१८ ते १९२४ या काळात त्यांनी फर्गसन महाविद्यालय आणि १९२५ ते १९३९ या कालावधीत कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात फारसी विषयाचे अध्यापन केले. सोप्या आणि मराठी शुद्धलेखनाचा पुरस्कार करणाऱ्या पटवर्धन यांनी ‘भाषाशुद्धि-विवेक’ ग्रंथाचे लेखन केले. सध्या कालबाहय़ झालेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची या ग्रंथामध्ये
समाविष्ट आहे. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन त्यांनी केले. १९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या तेव्हाच्या ग्रंथकार संमेलनाचे (सध्याचे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन) अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मुंबई विद्यापीठाची डी. लिट. स्वीकारल्यानंतर वयाच्या अवघ्या ५५व्या वर्षी माधव ज्यूलियन या साहित्यव्रतीची प्राणज्योत मालवली.