अंधश्रद्धा आणि गैरसमजांमुळे धोक्यात; उंदीर आणि घुशींच्या उपद्रवापासून रक्षण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंधश्रद्धा आणि गैरसमज यामुळे धोक्यात असलेल्या घुबड या पक्ष्याच्या संवर्धनासाठी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे देशातील पहिल्या उलूक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (२९ नोव्हेंबर) आणि शुक्रवार (३० नोव्हेंबर) इला फाउंडेशनतर्फे हा महोत्सव भरवण्यात येत आहे. संस्कृत भाषेत घुबड पक्ष्याचे उलूक असे नाव आहे.

इला फाउंडेशनचे संस्थापक आणि पक्षी तज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी या महोत्सवाबाबत माहिती दिली. डॉ. पांडे म्हणाले, घुबड दिसले तर माणूस मरतो या अंधश्रद्धेतून त्याचे मढेपाखरू असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र शेतातील उंदीर आणि घुशींच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांची सुटका करणारे घुबड शेतकऱ्यांचा मित्र आहे. गैरसमजातून होणाऱ्या कत्तलींमुळे घुबडांच्या दोनशे बासष्ठ प्रजातींपैकी केवळ पंच्याहत्तर प्रजाती आढळून येतात. त्यातील सुमारे चाळीस प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. त्यांचे संवर्धन करायचे असेल तर लहान मुलांची घुबडाशी मैत्री होणे आवश्यक आहे. याच विचारातून सुमारे दीडशे शाळांचे दहा हजार विद्यार्थी या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. महोत्सवाआधी केलेल्या आवाहनातून विद्यार्थ्यांनी तयार केलेली बाराशे चित्रे, पोस्टर, शिल्प, काष्ठशिल्पांचे प्रदर्शन महोत्सवामध्ये भरविण्यात येणार आहे.

भारतात २०१५ मध्ये अंधश्रद्धा, गैरसमज आणि तस्करीसाठी सुमारे अठ्ठय़ाहत्तर हजार घुबडांची हत्या झाली अशी नोंद आहे. याचे प्रमुख कारण घुबडांचे अधिवास असलेले प्रचंड आकाराचे वृक्ष नष्ट होत आहेत. त्यांच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी निसर्गाच्या साखळीतील घुबडांचे महत्त्व, त्यांची माहिती, छायाचित्रे असलेली टपाल तिकिटे, नाणी, चलनी नोटा पाहण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच महोत्सव असून पुढील वर्षी (नोव्हेंबर-डिसेंबर २०१९) मध्ये वर्ल्ड औल कॉन्फरन्स भरविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे इला फाउंडेशन कडून सांगण्यात आले आहे.

घुबड आणि अंधश्रद्धा

घुबड दिसल्याने माणूस मरतो अशी ठाम अंधश्रद्धा असल्याने घुबडाचे दर्शन अशुभ मानले जाते. या पक्ष्याच्या कानांची रचना एका रेषेत नाही. तसेच अतितीव्र ध्वनिलहरी ऐकण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला कर्णपिशाच्च म्हणून संबोधले जाते. घुबडाचे पंख अतिशय मऊ असल्याने उडताना त्याच्या पंखांचा आवाज होत नाही, केवळ सावली दिसते. त्यामुळे उडणारे घुबड म्हणजे भूताची सावली असा समज रूढ आहे. माणसासारखे दोन्ही डोळे समोरील बाजूस, ३६० अंशांमध्ये फिरणारी मान आणि डोळ्यांच्या दोन्ही पापण्यांची होणारी हालचाल यांमुळे त्याच्याबद्दल भीती पसरवली जाते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First owl festival in the country from tomorrow in purandar taluka
Show comments