पुणे शहराचा विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावली सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा पद्धतीने व भाषेत प्रसिद्ध होणे आवश्यक असताना अहवाल व नियमावली फक्त इंग्रजीतूनच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे ही माहिती तातडीने मराठीतून प्रसिद्ध करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, वारंवार मागणी केल्यानंतरही विकास आराखडय़ाशी संबंधित जमीन वापराचे नकाशे अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.
 सन २००७ ते २०२७ या कालावधीसाठीचा विकास आराखडा महापालिकेने हरकती-सूचनांसाठी प्रसिद्ध झाला असला, तरी तो सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत प्रसिद्ध झालेला नाही. प्रस्तावित आराखडा, त्याचा अहवाल आणि त्यासोबतची विकास नियंत्रण नियमावली मराठीतून प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. व त्यानंतर हरकती-सूचना घेण्यासाठी तीस दिवसांची मुदत द्यावी, असे पत्र सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे, सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार आणि नागरी हक्क समितीचे सुधीरकाका कुलकर्णी यांनी सोमवारी आयुक्तांना दिले. आराखडय़ावरील हरकती-सूचना प्रशासनाकडे पाठवणे ई-मेलद्वारे शक्य होणेही आवश्यक असून त्यासाठीचा ई-मेल पत्ता तातडीने जाहीर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, विकास आराखडा तयार करतानाची सर्वात महत्त्वाची म्हणून जी गोष्ट मानली जाते ते विद्यमान जमीन वापराचे नकाशे व त्यासंबंधीचा अहवाल स्वयंसेवी संस्थांनी वारंवार मागणी करूनही अद्याप उपलब्ध करून दिला जात नसल्याचे सोमवारी पुन्हा स्पष्ट झाले. आयुक्तांच्या आदेशानंतरही ही माहिती लवपली जात असल्यामुळे त्यात निश्चितपणे चुका झाल्याची चर्चा आहे. हे काम नक्की कोणी केले, याबाबतही शंका उत्पन्न झाली आहे.