महापालिकेतील विविध समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक सोमवारी (१ एप्रिल) होत असून संख्याबळानुसार तसेच आघाडीमधील वाटाघाटींनुसार शहर सुधारणा आणि महिला बाल कल्याण समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार आहे, तर विधी व क्रीडा समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. या निवडणुकीसाठी मनसे, भाजप आणि शिवसेना अशी महायुती प्रथमच महापालिकेत झाली आहे.
महापालिकेतील शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण आणि क्रीडा या चार समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक सोमवारी होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठीचे अर्ज गुरुवारी दाखल करायचे होते. अर्ज दाखल करताना महायुतीतर्फे अर्ज दाखल करण्यात आले, तर सत्ताधाऱ्यांची आघाडी कायम राहिली. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची सत्ता असून या चारपैकी शहर सुधारणा आणि महिला व बालकल्याण या दोन समित्यांची अध्यक्षपदे राष्ट्रवादीकडे होती, तर क्रीडा आणि विधी समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले होते.
आगामी निवडणुकीसाठी मात्र या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांची अदलाबदल करण्यात आली आहे. क्रीडा आणि विधी समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर उपाध्यक्षपद काँग्रेसला आणि शहर सुधारणा व महिला, बालकल्याण समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात आले आहे. या प्रत्येक समितीमध्ये आघाडीकडे सात (राष्ट्रवादी पाच, काँग्रेस दोन), तर महायुतीकडे (मनसे तीन, भाजप दोन, शिवसेना एक) सहा मते आहेत. त्यामुळे समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी आघाडीचेच उमेदवार विजयी होतील, असे चित्र आहे.