पुणे : राज्यात बारावीची परीक्षा सुरू असताना स. प. महाविद्यालयातील दोन अंध विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची परीक्षा संगणकाद्वारे स्वत: दिली आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठीची सुविधा निर्माण करून विभागीय मंडळाच्या मान्यतेने हा प्रयोग यशस्वी करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत अंध विद्यार्थ्यांनी संगणकाचा वापर करून परीक्षा देण्याची घटना पुण्यात पहिल्यांदाच घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी लेखनिकाची मदत घ्यावी लागते. मात्र अनेकदा लेखनिक न मिळाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांना संगणकाद्वारे परीक्षा देण्याची सुविधा निर्माण केली जात आहे. अलीकडेच मॉडर्न महाविद्यालयातही अंध विद्यार्थ्यांनी संगणकाद्वारे परीक्षा देण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यानंतर आता बारावीच्या परीक्षेत स. प. महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी संगणकाद्वारे यशस्वीरित्या परीक्षा दिली.

हेही वाचा…पुणे : शिक्षण विभागातील गैरप्रकार उघडकीस आणणारे अधिकारी किसन भुजबळ यांचे निधन

महाविद्यालयातील प्रा. योगिता काळे म्हणाल्या, की यंदा बारावीचे एकूण १० अंध विद्यार्थी आहेत. पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण गेल्या वर्षीपासून देण्यात येत होते. त्याशिवाय बुकशेअर या स्वयंसेवी संस्थेने लॅपटॉप उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना देवनागरी, इंग्रजी टंकलेखन प्रशिक्षणही दिले. त्यानंतर तीन विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा संगणकाद्वारे दिली होती. तर दोन विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाची परीक्षाही संगणकाद्वारे देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करून महाविद्यालयात परीक्षेसाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली.

पुणे विभागीय मंडळाच्या मान्यतेने मराठी विषयाची परीक्षा दोन विद्यार्थ्यांनी स्वत: संगणकाद्वारे दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, उपप्राचार्य आणि परीक्षा केंद्र प्रमुख देवानंद साठे, उपकेंद्र संचालक दिनेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत झाली. आता उर्वरित विषयांची परीक्षाही याच पद्धतीने घेतली जाणार आहे.

हेही वाचा…पुणेकरांसाठी मोठी बातमी; लोकसभेचे मतदान होईपर्यंत पाणीकपात नाही

मी आणि शशिकांत शिंदे अशा दोघांनी संगणकाद्वारे परीक्षा दिली. स्वत: संगणकाद्वारे परीक्षा देण्याचा अनुभव खूप चांगला होता. लेखनिक मिळण्यास अडचणी येतात, काहीवेळा लेखनिक दीर्घोत्तरे लिहिण्यास कंटाळा करतात. मात्र संगणकाद्वारे परीक्षा देण्याच्या सुविधेमुळे मनासारखी उत्तरे लिहिता आली. स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास मिळाल्याचे परीक्षा दिलेला विद्यार्थी नेताजी काणेकर याने सांगितले.

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून परीक्षा देण्याची मुभा देण्याचा निर्णय शासनाने २०१८ मध्ये शासन निर्णयाद्वारे घेतला आहे. त्यानुसार संगणकाद्वारे परीक्षा देण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. स. प. महाविद्यालयाने दिलेल्या प्रस्तावानंतर महाविद्यालयातील सुविधांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर संगणकाद्वारे परीक्षा देण्यास मान्यता देण्यात आली. – औदुंबर उकिरडे, सचिव, पुणे विभागीय शिक्षण मंडळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time in pune two blind students of class 12 took the exam through computer pune print news ccp 14 psg