पुणे : अनेक स्वयंसेवी संस्था समाजातील वंचित घटकांसाठी काम करीत आहेत. मात्र, त्यांना निधी मिळण्यात अडचणी येतात. याचबरोबर अनेक कंपन्या आणि दानशूरांना नेमक्या कोणत्या संस्थेला मदत करावी याचीही माहिती नसते. यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराने ‘सोशल स्टॉक एस्क्चेंज’चे बुधवारपासून कार्यान्वयन सुरू केले असून, या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना निधी उभारणी करण्याचा विशेष स्रोत खुला झाला आहे.
समाजातील वंचित घटकांसाठी खडतर परिश्रम घेऊन काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, तसेच अशा होतकरू संघटनांना मदत देऊ इच्छिणारे हातही असतात. मात्र, अशा चांगल्या संस्थेपर्यंत पोहचण्याचा मार्ग उपलब्ध नसल्याने इच्छा असूनही चांगल्या संस्थांना पैसे पोहचवता येत नाहीत. त्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) पुढाकार घेतला आहे. समाजसेवी संस्थांना (एनजीओ) शेअर बाजाराच्या माध्यमातून निधी उभारता येणार आहे.
सोशल स्टॉक एस्क्चेंजवर बुधवारी एसजीबीसी उन्नती फाऊंडेशन ही पहिली स्वयंसेवी संस्था बुधवारी सूचिबद्ध करण्यात आली. या वेळी एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान, सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. बालसुब्रह्मण्यम, उन्नतीचे संस्थापक संचालक रमेश स्वामी, सेबीचे आजीव सदस्य अश्वनी भाटिया हे उपस्थित होते.
सोशल स्टॉक एक्स्चेंज हे स्वयंसेवी संस्थांसोबत कंपन्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. कंपन्यांना सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत निधी खर्च करावा लागतो. अशा कंपन्यांना चांगले काम करणाऱ्या विश्वासार्ह स्वयंसेवी संस्थांची माहिती या मंचाच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे कंपन्या या स्वयंसेवी संस्थांना निधी देऊन समाजात आश्वासक बदल घडविण्यास मदत करतात. एनएसईकडून योग्य तपासणी आणि छाननी झाल्यानंतरच स्वयंसेवी संस्था सूचिबद्ध केली जाणार आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने काम करणारी संस्थाच सूचिबद्ध होईल, याची काळजी घेतली जाणार आहे. या संस्थांना त्यांच्या कामाचे अहवाल वेळोवेळी एनएसईकडे सादर करावे लागतील. त्यामुळे त्यांच्या कामातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
सोशल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना निधी उभारणीसाठी एक मंच उपलब्ध झाला आहे. तसेच आणखी तीन संस्था चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात या मंचावर सूचिबद्ध होत आहेत. – श्रीराम कृष्णन, मुख्य व्यवसाय विकास अधिकारी, राष्ट्रीय शेअर बाजार